कोकणरत्न सुरेश प्रभुंची सूसाट निघालेली गाडी ‘खंडाळ्याच्या घाटातून’ वळणे घेत शेवटी कोणत्याही नव्या आश्वासनांची खैरात न करता यार्डात विसावते तोच विरोधकांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. एरव्ही रेल्वे अर्थमंत्र्यांचे भाषण म्हणजे आश्वासनांची पर्वणी असते. आपापल्या राज्यासाठी घोषणेच्या प्रतिक्षेत असलेल्या खासदारांच्या चेहऱ्यावर उत्कंठा असते. पण प्रभुंचा ‘प्रसाद’ यंदा कुणालाही मिळाला नाही.   प्रवाशांना मात्र सोयी-सुविधांचा ‘प्रसाद’ देण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रभूंच्या धाडसाचे कौतूक संसदेच्या आवारात सुरू झाले. सत्तेत असूनही आपल्याला काहीही मिळाले नाही ही सत्ताधाऱ्यांची खंत होती तर प्रभुंनी निराशा केली अशी विरोधी पक्षाच्या सदस्यांची प्रतिक्रिया होती.
निर्धारिक वेळेपेक्षा १४ मिनिटे उशीरा प्रभुंचे भाषण सुरू झाले.  खणखणीत आवाजात भाषणाची सुरूवात करणाऱ्या प्रभुंनी पहिल्यांच वाक्यापासून सभागृह ताब्यात घेतले खरे पण त्यांच्या भाषणाच्या उत्तरार्धात काही सदस्य शब्दश पेंगू लागले. ‘ह प्रभु, हे कसे होणार?’ या रेल्वे मंत्र्यांच्या वाक्याला जोरदार हशा पिकला. प्रभुंचे उत्तर आले नाही; पण ‘या’ प्रभुने उत्तर दिले, असे म्हणून रेल्वे मत्र्यांनी गांधीजींचे स्मरण केले. रेल्वेचे विशाल नेटवर्क, संसाधन, मनुष्यबळ व राजकीय इच्छाशक्ती असताना हे कसे होणार, अशा प्रश्न ‘प्रभू’ला विचारून रेल्वेच्या पुनर्जन्म होण्याची भविष्यवाणी रेल्वे मंत्र्यांनी वर्तवली!
‘कुछ नया जोडना होगा, कुछ पुराना तोडना होगा- असं म्हणत प्रभू यांनी रेल्वेच्या आत्तापर्यंतच्या दुर्दशेची कहाणीच कथन केली कुछ इंजिन बदलने होगे, कुछ पुर्जे रिपेअर करने होंगे, कुछ ताकत दिखानी होगी, कुछ कमजोरिया मिटानी होगी.या रेल्वेच्या आत्मनिवेदनात काही रस्ते बदलून नव्या दिशेचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रभु करीत होते.  

खंडाळ्याच्या घाटात गाडी!
इंगजीतून भाषणाला सुरूवात करणाऱ्या प्रभु यांनी अधून-मधून हिंदीतून फटकेबाजी केली. भाषणाच्या सुरूवातीच्या पाच मिनिटात प्रभू एक्सप्रेस खंडाळ्याच्या घाटात शिरली. रेल्वे मंत्र्यांच्या भाषणात उल्लेख होता तो – शुभदा गोगटे यांच्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या पुस्तकाचा! घाटाच्या निर्मितीची ही काल्पनिक कहाणी कथन करताना सुरेश प्रभू यांनी जणू काही रेल्वेला वास्तवाच्या फलाटावर उभे केले.

मालवीय अध्यासन केंद्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील बनारस हिंदू विश्वविद्यालयात पंडीत मदन माहेन मालवीय यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याची घोषणा प्रभूंनी करताच सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला.  कोणत्याही नव्या रेल्वे गाडय़ांची घोषणा करण्याचे भाषणादरम्यान होणार नसल्याचा अंदाज आल्यानंत मात्र विरोधीच नव्हे तर सत्ताधारीही सुस्तावले.

वातानुकूलित गाडी वर्षअखेपर्यंत?

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी वातानुकूलित गाडय़ांची घोषणा करण्यात आली असली, तरी ही घोषणा गेल्या दोन अर्थसंकल्पांमध्येही झाली आहे. मात्र मुंबईकरांना अद्यापही वातानुकूलित लोकलच्या अफवांशिवाय हाती काहीच लागलेले नाही. पण आता ही गाडी पुढील दोन महिन्यांत मुंबईत दाखल होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत या गाडीच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त या गाडीच्या चाचण्या घेऊन गाडीला सुरक्षा प्रमाणपत्र देतील. त्यानंतरच ही गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांना घामाच्या धारा गाळत प्रवास करावा लागणार आहे.

आता पाच मिनिटांत तिकीट
तिकीट रांगांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सीव्हीएम कुपन्सपासून एटीव्हीएमपर्यंत विविध पर्याय शोधणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात पाच मिनिटांत तिकीट देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी मोबाइल तिकिटिंग, तिकिटांसाठी हॉट बटण आदी पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मोजक्या स्थानकांची यादी असलेले एटीव्हीएम मशीन तयार करून प्रवाशांना हॉट बटणाचा पर्याय दिला जाणार आहे. त्यामुळे एक बटण दाबताच त्यांना हवे ते तिकीट मिळेल. त्याचप्रमाणे डेबिट कार्डच्या मदतीने एटीव्हीएमद्वारे तिकीट देण्याची सोय करण्यात आली आहे.

देशभरात एकच हेल्पलाइन क्रमांक
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आता देशभरासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. १३८ हा क्रमांक डायल केल्यानंतर प्रवाशांना देशभरात कुठेही तक्रार दाखल करता येईल अथवा मदत मिळू शकेल. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठीही देशभरात १८२ हा नवीन क्रमांक सुरू करण्याची घोषणा प्रभू यांनी केली.

अर्थसंकल्पीय भाषणात खंडाळा घाटाचा प्रभू यांनी उल्लेख केला, पण अर्थसंकल्पात राज्याला प्रत्यक्षात कात्रजचा घाट दाखविला आहे. गेल्या वर्षी प्रवासी भाडेवाढ झालेली असल्याने भाडेवाढ झाली नाही यात काही अर्थ नाही
-माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

प्रभू हे राज्यातील असल्याने मुंबई व राज्याच्या पदरात काहीतरी भरीव पडेल अशी अपेक्षा होती, पण रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्राची निराशा केली.खासगीकरणावर भर देण्यात आला आहे हा निर्णय कोणा उद्योगपतीच्या फायद्यासाठी नाही ना, असा सवाल आहे.
-नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

रेल्वे अर्थसंकल्पाने मोठी निराशा
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने जनतेच्या पदरी मोठी निराशा टाकली आहे. या संकल्पाने नवे काहीही साधलेले नाही, तर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात रेल्वेविकासाचा जो आराखडा तयार करण्यात आलेला होता. त्याचीच री केंद्र सरकारने ओढली आहे, अशी टीका काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. सध्याच्या सरकारने रेल्वे विकासासाठी कोणतीही योजना आणली नसल्याची टीका त्यांनी केली.