राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकलो, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. ते सोमवारी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते. सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या भारतीय सैन्याच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे पंतप्रधान महात्मा गांधींच्या भूमीतून आलेले आणि गोव्यातून आलेले संरक्षणमंत्री हे सर्वस्वी वेगळ्याप्रकारचे समीकरण आहे. मला अनेकदा याचे आश्चर्य वाटते. मात्र, संघाची शिकवणी हा आमच्या विचारसणीचा मुख्य गाभा असल्यामुळे हे शक्य झाले, असे पर्रिकर यांनी म्हटले.
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला झाल्यानंतर लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले होते. त्यामुळे पंतप्रधान आणि मला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. उरी हल्ल्यात १९ जवान शहीद झाल्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत सोशल मिडीया आणि प्रसारमाध्यमांवर पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत होते. मलाही बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले , असे यावेळी पर्रिकर यांनी सांगितले. यावेळी पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांवरून रंगलेल्या राजकारणावरही भाष्य केले. काही लोक सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. मात्र, पुरावे देऊनही काही लोकांचे समाधान होणार नाही. भारतीय लष्कर कोणतीही कारवाई करते तेव्हा ती जगातील उत्कृष्ट, व्यवसायिक, शौर्यपूर्ण आणि उच्च एकाग्रतेची कृती असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे, असेही पर्रिकर यांनी सांगितले.