पाकिस्तानच्या हद्दीत शिरून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानातील अनेक नेत्यांचा पारा चढला आहे. भारतीय लष्कराकडून पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याची माहिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि नेत्यांकडून ‘भारताला योग्य प्रत्युत्तर देऊ’, अशा थाटाच्या अनेक गर्जना करण्यात येत आहेत. अशा गर्जना करणाऱ्यांमध्ये आता पाकिस्तानमधील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची भर पडली आहे. नरेंद्र मोदींना कसे उत्तर द्यायचे, हे नवाज शरीफ यांना मी दाखवून देईन, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील प्रख्यात ‘डॉन’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या पाकव्याप्त पंजाब प्रांतातील रायविंड येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या सर्व प्रांतातील लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे. मी नवाज शरीफ यांना मोदींना कसे उत्तर द्यायचे, हे दाखवून देईन, असे इम्रान खान यांनी सांगितले.

यावेळी इम्रान खान यांनी शरीफ यांच्या अकार्यक्षमतेवरही ताशेरे ओढले. शरीफ हे सरकारचा कारभार चालवण्याच्यादृष्टीने अकार्यक्षम आहेत. लष्करप्रमुख राहील यांच्याकडेच पाकिस्तानचा चेहरा म्हणून पाहिले जाते, असेही यावेळी इम्रान खान यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते.  सूत्रांच्या माहितीनुसार,  या हल्ल्यात दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. या घटनेनंतर पाकिस्तानकडून काही लष्करी हालचाली झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तान सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुटीवर असलेल्या सीमेवरील सैनिकांना परत बोलावण्यात आले आहे. तसेच सीमेजवळील शाळांनाही सुटी देण्यात आली आहे.