लोकसभेतील दारुण पराभवानंतर पुन्हा नव्याने उभे राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसने पक्ष संघटनेत फेरबदल सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याकडे प्रसार माध्यमाची जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर आज एक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या माध्यम विभागाची धुरा रणदीप सुरजेवाला यांच्या खांदेवर दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरजेवाला यांना काँग्रेस जनमाध्यम प्रमुखपदी नेमणूक केली. याआधी ही जबाबदारी अजय माकन यांच्याकडे होती. अलीकडे त्यांची दिल्ली काँग्रेसच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.
 पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, अजय माकन यांना दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आल्यानंतर अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरजेवाला यांना पुढील सूचनेपर्यंत काँग्रेस संवाद विभागाचे प्रमुख नियुक्त केले आहे.