सुरियानेल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने प्रमुख आरोपी धर्मराजन याला जन्मठेपेची शिक्षा दिली असून इतर तेवीस जणांची शिक्षाही कायम केली आहे. न्या. के. टी. शंकरन, एम. एल. जोसेफ फ्रान्सिस यांनी आरोपींनी केलेल्या अपिलावर हा निकाल दिला. यात अल्पवयीन असलेल्या मुलीला केरळ व तामिळनाडूत विविध भागांत नेऊन बलात्कार करण्यात आला. या निकालाने अठरा वर्षांनंतर पीडित मुलीला न्याय मिळाला आहे. पीडित मुलीने या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. आरोपींनी तिला घेऊन ३००० कि.मी. प्रवास केला व सुमारे ४० दिवस चाळीस लोकांनी तिच्यावर बलात्कार करून २६ फेब्रुवारी १९९६ रोजी तिला सोडून दिले. या प्रकरणात ३६ आरोपी होते. त्यातील पाच जण सुनावणीच्या काळात मरण पावले तर सात आरोपींना आज न्यायालयाने आरोपमुक्त केले. न्यायालयाने या प्रकरणात ५ ते १३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व दंडाची शिक्षा २३ आरोपींना ठोठावली. प्रथम आरोपी राजू हा इडुक्कीतील बसवाहक असून दुसरी आरोपी उषा हिने या पीडित मुलीला खरेदी करून इतर आरोपींना विकले होते. न्यायालयाने सदर मुलीचे चारित्र्य वाईट होते हा आरोपींचा युक्तिवाद फेटाळला. या मुलीने सुटून जाण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळेही बलात्काराचा आरोप योग्य नाही हाही युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला.
न्यायालयाने सांगितले, की धर्मराजन याने तिला सापळय़ात अडकवून धमकावले. कोट्टायमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी दिलेली शिक्षा कायम करण्यात येत असून, आरोपीची विनंती फेटाळण्यात येत आहे. त्या मुलीचे राजूवर प्रेम होते व त्याने तिला सोन्याचे दागिने देण्याचे कबूल केले होते, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे ती पथभ्रष्ट झालेली नव्हती. पैसा व लालसेपोटी घरातून बाहेर पडली नव्हती. ती बालवेश्या नव्हती असे न्यायालयाने सांगितले. राज्यात महिला व बालक-बालिकांविरोधातील गुन्हे वाढत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. २००५ मध्ये न्यायालयाने यातील ३५ आरोपींची सुटका केली होती, तर धर्मराजन या मुख्य आरोपीवर स्वतंत्र खटल्यात जन्मठेप रद्द करून पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. त्याला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने खास पीठ स्थापन करून अपिलांची सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीत  खास न्यायपीठ स्थापन करण्यात आले. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारीला फरारी असलेल्या धर्मराजन याला कर्नाटकातील सागर येथे अटक करण्यात आली. टीव्ही चॅनेलवर दिसल्याने तो सापडला.
केरळातील इडुक्की जिल्हय़ात १९९६ मध्ये सुरियानेली येथील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. यात ५९८ पानांचे पुरावे मांडण्यात आले असून ते ग्राहय़ धरण्यात आले.
१६ जानेवारी १९९६ रोजी राजू नावाच्या बस कंडक्टरने या मुलीचे अपहरण करून नंतर उषा व धर्मराजन (जो वकील आहे) यांना विकले. नंतर या मुलीला तामिळनाडू व केरळात अनेक ठिकाणी नेऊन चाळीस जणांनी तिच्यावर बलात्कार केला.