राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचे नाव सूर्यनेल्ली सेक्स स्कॅण्डलमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी करणारी, पीडित महिलेने केलेली याचिका येथील सत्र न्यायालयाने फेटाळल्याने कुरियन यांना दिलासा मिळाला आहे.
कुमिली येथील एका गेस्ट हाऊसमध्ये या महिलेला डांबून ठेवण्यात आले होते. त्या गेस्ट हाऊसवर आपण कुरियन यांना एका गाडीतून सोडले होते, असा गौप्यस्फोट या प्रकरणातील एकमेव आरोपी धर्मराजन याने काही महिन्यांपूर्वी केला होता. त्या आरोपाच्या आधारे सदर महिलेने १७ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात कुरियन यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
कुरियन यांना आपण कधीही भेटलेलो नाही, आपण मीडियामध्ये जे निवेदन दिले तेव्हा आपली मानसिक स्थिती ठीक नव्हती, असे सांगून धर्मराजन याने आरोपापासून घूमजाव केले. त्यानंतर कुरियन यांच्याविरुद्धची याचिकाकर्त्यांची याचिका दाखल करून घेता येत नसल्याचा निर्णय सत्र न्यायमूर्ती अब्राहम मॅथ्यू यांनी
दिला.