जम्मू-काश्मीरमधली कुपवाडा सेक्टरमध्ये सोमवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. येथील कावारी वारनाऊ येथे ही चकमक झाली. सध्या लष्कराकडून या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

तत्पूर्वी पाकच्या सैन्याने काल रात्री जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा, पुलवामा, पर्गवाल आणि अखनूर सेक्टरमधील BSFच्या चौक्यांवर गोळीबार केला. यामध्ये BSF चे जवान सुशीलकुमार हे शहीद झाले आहेत. काल रात्री आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. जखमी झाल्यानंतर त्यांना रात्री सरकारी वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान सुशीलकुमार यांचा मृत्यू झाला. सध्याही आरएसपुरामध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती BSFच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या गोळीबारात तीन नागरिकही जखमी झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने काल रात्री आरएस पुरासह पुलवामा, पर्गवाल आणि अखनूर येथील भारतीय चौक्यांवरही गोळीबार केला. पुलवामाच्या सिरनू येथील अल्पसंख्याकाच्या घरांचे रक्षण करणाऱ्या BSFच्या चौकीचाही यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याने याठिकाणी जोरदार गोळीबार केला. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला होता. तर पर्गवाल सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय सैन्याकडून पाकच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
‘देशातील नेते उपचारांसाठी परदेशात जातात, मग सैनिक का नाही?’
आमच्या जवानांना हात लावाल, तर त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा कडक इशारा सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानला देण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वीच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सात पाकिस्तानी रेंजर्सना यमसदनी धाडले होते. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा गुरनाम सिंह हा जवान जखमी झाला होता. गुरनामचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहीद गुरनामला अखेरचा निरोप दिल्यावर अरुण कुमार यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. ‘त्यांच्याकडून जराही आगळीक झाली, तर त्यांना त्यांच्याच शब्दांमध्ये उत्तर दिले जाईल,’ असे अरुण कुमार यांनी म्हटले होते. सध्या सीमेवर शांतता आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे का, असा प्रश्न सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांना विचारण्यात आला. ‘याबद्दल आता काहीच सांगता येणार नाही. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहोत,’ असे उत्तर अरुण कुमार यांनी दिले.