परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मंगळवारी (दि. २६) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. नियमित तपासणीसाठी सुषमा स्वराज यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. स्वराज यांना सांयकाळी दाखल करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी करून रूग्णालयातून सोडण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांची तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
भाजपच्या ६४ वर्षीय नेत्या सुषमा स्वराज यांना याच वर्षी एप्रिल महिन्यात एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी छाती दुखत असल्याची तक्रार केली होती. डॉक्टरांनी त्यांच्या विविध चाचण्या घेतल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे उघड झाले होते किडनीमध्येही काही प्रमाणात संसर्ग झालेला होता. परदेश दौर्‍याच्या काळात कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना हा त्रास झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्‍त केली होती.