संयुक्त राष्ट्र आमसभेत भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७१ व्या सत्राला संबोधित करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कला पोहोचल्या असून, सर्वाच्या नजरा स्वराज यांच्या आजच्या भाषणाकडे लागल्या आहेत. आपल्या भाषणामध्ये त्या पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांना सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.

सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्राच्या महासभेला आज दुपारी संबोधित करणार आहेत. त्या न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्या असल्याचे ट्वीट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी केले आहे.

शरीफ यांनी महासभेत काश्मीरचे तुणतुणे वाजवले होते. त्यामुळे सुषमा स्वराज शरीफ यांना कडक भाषेत उत्तर देणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारताने पाकला दहशतवादी देश, दहशतवाद्यांना समर्थन करणार देश असे म्हटले आहे.

दहशतवादाची चिंता भारतासह संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे यावर ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील सुधारणा, शाश्वत विकास, हवामान बदल, सुरक्षा आणि शांतता या मुद्दय़ांना भारताची प्राथमिकता असल्याचे देशाचे राजदूत सैयद अकबरउद्दीन यांनी म्हटले आहे.