वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा दिला जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही घोषणा करत असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानमधील अनेक नागरिक वैद्यकीय मदतीसाठी स्वराज यांच्याकडे ट्विटरवरुन मदत मागतात. यावर भाष्य करताना त्यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या आमना शमीन यांनी वैद्यकीय उपचारांसाठी ‘मेडिकल व्हिसा’ देण्याची मागणी सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. शमीन यांच्या विनंतीला स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘कृपया पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधा. आम्ही यासाठी आवश्यक परवानगी देऊ,’ असे स्वराज यांनी म्हटले. शमीन यांच्या वडिलांवर दिल्लीत उपचार सुरु आहेत. त्यामुळे शमीन यांना त्यांच्या भेटीसाठी दिल्लीत यायचे आहे.

शमीन यांच्या आधीही पाकिस्तानमधील अनेकांनी वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यासाठी स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मेडिकल व्हिसासाठी प्रलंबित असलेल्या अर्जांना मंजुरी देण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व अर्जदारांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल,’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे. यासोबतच स्वराज यांनी कालच इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाला वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या एका पाकिस्तानी मुलाला मदत करण्याच्या सूचना केल्या.

मुलाच्या उपचारासाठी भारतात यायचे असून त्यासाठी मेडिकल व्हिसाची गरज असल्याची विनंती पाकिस्तानी नागरिक काशिफ यांनी केली होती. काशिफ यांना त्यांचा मुलगा अब्दुल्लाच्या हृदय प्रत्यारोपणानंतरच्या तपासणीसाठी भारतात यायचे होते. यासाठी काशिफ यांनी मेडिकल व्हिसाची विनंती केली होती. काशिफ यांच्या विनंतीला स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, उपचारांअभावी मुलाच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये, असे ट्विट केले होते.