सर्व भारतीय हे माझेच आहेत, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे. मुस्लिमांच्या व्हिसाला प्राधान्य देत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांच्यावर ट्विटरवरुन करण्यात आला होता. ‘मोदीजी सुषमा स्वराज केवळ मुस्लिमांना व्हिसा देण्याला प्राधान्य देतात. स्वराज यांच्याकडून हिंदूंना भारताच्या व्हिसासाठी मात्र त्रास दिला जातो. हे अत्यंत दुर्देवी आहे,’ असे ट्विट हिंदू जागरण या ट्विटर खात्यावरुन करण्यात आले होते. या ट्विटला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

हिंदू जागरण या ट्विटर खात्याकडून करण्यात आलेल्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी त्वरित आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्यासाठी धर्म आणि जाती महत्त्वाचे नाही. कारण भारत हा एक देश आहे आणि सर्व भारतीय माझेच आहेत, अशा अर्थाचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले आहे. ‘भारत हा माझा देश आहे. सर्व भारतीय हे माझे आहेत. यामध्ये जात, राज्य, भाषा आणि धर्म येत नाही,’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.

सुषमा स्वराज अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना सुषमा स्वराज यांना चांगलेच फैलावर घेतले होते. भारतीय राष्ट्रध्वजाची रंगाची पायपुसणी संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराज यांनी रडारवर घेतले होते. भारतीय राष्ट्रध्वजाची रंगाची पायपुसणी संकेतस्थळावरुन हटवून माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा स्वराज यांनी अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना दिला होता. यानंतर अॅमेझॉनने त्वरित माफी मागून वादग्रस्त पायपुसणी संकेतस्थळावरुन हटवली होती.

सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा लोकांना मदत केली आहे. परदेशात असणाऱ्या भारतीयांच्या मदतीला सुषमा स्वराज अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून धावून गेल्या आहेत. अॅमेझॉनला खडसावल्यानंतर ‘परदेशात असणाऱ्या भारतीयांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी मला ट्विट करताना टॅग करा. मग मी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालेन,’ असे स्वराज यांनी म्हटले होते.