ओमानला भारताशी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यास खूप वाव आहे असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या दौऱ्याप्रसंगी सांगितले. येत्या काही दिवसांत आम्ही सुधारणा कार्यक्रम राबवित असून परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे.
भारत व ओमान या दोन देशात धोरणात्मक भागीदारीला महत्त्व आहे. संरक्षण व सागरी क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊ शकतात.
तेलसंपन्न असलेल्या ओमानला स्वराज यांची पहिलीच भेट असून त्यांनी त्यांचे समपदस्थ युसूफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली व द्विपक्षीय, राजकीय, आर्थिक , संरक्षण व सुरक्षा विषयक प्रादेशिक स्थितीवर त्यांचे बोलणे झाले.
गेल्या सात वर्षांत ओमानला भेट देणाऱ्या स्वराज या पहिल्याच परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी उपपंतप्रधान सय्यद फहद बिन महमूद अल सैद व राज कार्यालयाचे मंत्री  व संरक्षण मंडळाचे प्रमुख सुलतान बिन महंमद अली नुआमनी यांची भेट घेतली.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांनी एकमेकात संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. स्वराज यावेळी म्हणाल्या की, ओमान भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा करू शकतो.  सागरातून पाईपलाईन टाकण्याचा मुद्दाही त्यांनी माडंला. चाचेगिरीचा प्रश्नही महत्त्वाचा असून दोन्ही देशांनी हिंदी महासागर क्षेत्राच्या सुरक्षेत सहकार्य करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.