डोकलामबाबत चीनच्या कृतीमुळे भारताची सुरक्षा धोक्यात – स्वराज

सिक्कीम भागात भारत व चीन यांच्यात निर्माण झालेली तणावाची कोंडी फोडण्यासाठी चीनशी बोलणी करण्यास भारत तयार आहे, मात्र त्याआधी दोन्ही देशांनी आपले सैन्य तेथून माघारी घेणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सांगितले. सीमा प्रश्नावर ‘शांततापूर्ण तोडगा’ काढण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

सीमेवरील वादग्रस्त भागात रस्ते बांधण्यापासून भारतीय फौजांनी चीनच्या लष्कराला रोखल्यानंतर तिबेटच्या दक्षिण टोकावरील डोकलाम भागात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये गेल्या महिनाभरापासून तंटा उद्भवला आहे. भारताचे मित्रराष्ट्र असलेल्या भूतानचाही या भागावर दावा आहे. आपण आपल्याच हद्दीत बांधकाम करत असल्याचा दावा करून, भारतीय फौजांनी येथून तात्काळ मागे जावे अशी चीनची मागणी आहे. भूतानलगत असलेल्या तिठय़ाची स्थिती एकतर्फी बदलण्याची चीनची इच्छा असून, त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

डोकलाम येथील कोंडीबाबत बोलताना स्वराज यांनी भारत, चीन व भूतान यांच्यात २०१२ साली झालेल्या लेखी कराराचा हवाला दिला. तिठय़ाजवळील (ट्राय-जंक्शन पॉइंट) सीमेबाबत हे तिन्ही देश मिळून निर्णय घेतील असे या करारान्वये ठरले आहे.

चीनने यापूर्वीही सीमेवर रस्ते बांधले आहेत, मात्र या वेळी त्यांनी बुलडोझर आणि खनन यंत्रे आणली आहेत. हे मुद्दे चर्चेतून सोडवले जाऊ शकतात, मात्र दोन्ही देशांनी आधी आपले लष्कर मागे घ्यायला हवे असे आमचे म्हणणे असल्याचे स्वराज यांनी सांगितले.

डोकलाम सीमेच्या मुद्दय़ावर भारत ‘अवास्तव’ काहीच सांगत नसून, या मुद्दय़ावर सर्व देशांचा आम्हाला पाठिंबा आहे असे स्वराज म्हणाल्या. या तिठय़ावरून भारतीय फौजा माघारी घ्याव्यात अशी मागणी चीन करत असला, तरी हा वाद बोलण्यांतून सलोख्याने सोडवण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले सैन्य मागे घ्यावे लागेल अशी भारताची भूमिका असल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.

या तिठय़ाचा ताबा घ्यायचा, जेणेकरून आपण त्या ठिकाणाचे स्थान एकतर्फी बदलू शकू असा त्यांचा (चीन) हेतू होता. ही घटना घडल्यानंतरच भारत पुढे आला, असे राज्यसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात स्वराज यांनी सांगितले.

चीनने अशा रीतीने तिठय़ाची स्थिती बदलल्यास भारताची सुरक्षितता धोक्यात येते. भूतानने या मुद्दय़ावर आधीच चीनकडे त्यांचा निषेध लेखी नोंदवला आहे, असे सांगून स्वराज म्हणाल्या की, चीन हा दक्षिण चीन समुद्रात त्याचे जाळे उभारत असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत स्वत:च्या सुरक्षेबाबत दक्ष राहिलेला आहे. दक्षिण चीन समुद्रात नौकानयन आणि विनाअडथळा व्यापार यांचे स्वातंत्र्य असण्याचा भारताने पुरस्कार केलेला आहे.

भारत-चीन राजनैतिक मार्ग अबाधित

बीजिंग : सिक्कीममध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक मार्ग अबाधित आहेत, मात्र चर्चा यशस्वी व्हावी यासाठी डोकलाममधून भारतीय सैन्य मागे घेण्यात यावे या पूर्वअटीचा चीनने पुनरुच्चार केला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक मार्ग अबाधित आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी येथे वार्ताहरांना सांगितले आणि सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याच्या प्रश्नावर चर्चा झाली असल्यास दुजोरा दिला. तथापि, भारतीय सैन्य मागे घेण्यात यावे या पूर्वअटीचा कांग यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, भारत आणि चीनमधील सीमा अद्याप निश्चित झालेली नाही आणि दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावयाचा आहे.