परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज शनिवारपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात असून नवे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हेही त्यांच्यासमवेत जाणार आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासमवेत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर स्वराज चर्चा करणार असून चीनमध्ये होणाऱ्या ‘रशिया-भारत-चीन’ बैठकीलाही त्या उपस्थित राहतील.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यासमवेत परराष्ट्र मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकारीही या दौऱ्यावर जाणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यानंतर आठवडाभरातच स्वराज या चीनला जात असून या दौऱ्यात त्या चिनी नेत्यांसमवेत द्विपक्षीय, प्रांतिक तसेच वैश्विक मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या वर्षी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यासंबंधीही उभय बाजूंची चर्चा होईल. ‘सुषमा स्वराज यांच्या या दौऱ्यास उभय बाजूंनी मोठे महत्त्व आहे’ असे मत चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनियांग यांनी व्यक्त केले.