सिडने शहरातील ओलीस-नाटय़ व पाकिस्तानातील पेशावरमधील शाळेवर झालेल्या नृशंस हल्ल्याविरोधात मानवतेच्या स्थापनेसाठी लढणाऱ्यांनी हातात हात घेऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात पेशावरच्या सैनिकी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तर राज्यसभेत सभापती हमीद अन्सारी यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी त्याचे समर्थन केले. दोन मिनिटे मौन पाळून या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुषमा स्वराज निवेदनात म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे मानवतेला काळिमा फासला गेला आहे. या संकटसमयी सीमारेषेची व मतभिन्नतेची मर्यादा ओलांडून भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे. भारतीय संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख स्वराज यांनी केला. त्या म्हणाल्या की, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारताने कठोर पावले उचलली आहेत. मानवी समाजात सलोखा व सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी सर्वशक्तिनिशी दहशतवादाविरोधात भारताने लढाई सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियातील ओलीस-नाटय़ १२ तासानंतर संपले. तिकडे पेशावरमध्ये दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात १३२ निष्पाप शाळकरी मुले व ९ अन्य जणांचा मृत्यू झाला. या कृत्याचा भारत निषेध करीत आहे.