केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ३० एप्रिल २०१३ रोजीचा आहे. भाजप हा पक्ष त्यावेळी विरोधी बाकांवर बसत होता, तर मीरा कुमार लोकसभा अध्यक्ष होत्या. ‘मीरा कुमार या लोकसभा अध्यक्ष म्हणून, विरोधकांना कशी वागणूक देतात?’ हे बघा असे सांगत सुषमा स्वराज यांनी चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

एप्रिल २०१३ मध्ये लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या म्हणून भूमिका बजावत असलेल्या सुषमा स्वराज या काँग्रेसचे घोटाळे कसे बाहेर येत आहेत याचे वर्णन करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी, राष्ट्रकुल स्पर्धांचा घोटाळा, कोळसा खरेदी घोटाळा आणि टूजी घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. सुरूवातीची तीन मिनिटे सुषमा स्वराज यांच्या भाषणात कोणताही व्यत्यय येत नाही. मात्र त्यानंतर मीरा कुमार, ‘थँक यू’, ‘ऑलराईट’, ‘ओके’, ‘आय हॅव टू प्रोसिड’ असे उल्लेख अनेकदा करताना दिसत आहेत. तसेच सुषमा स्वराज यांना त्यांचे म्हणणे मांडण्यापासून रोखत आहेत असे दिसून येते आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊ घातली आहे. अशात सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार कशी गळचेपी करतात याचे उदाहरण देण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ६ मिनिटांच्या भाषणात आपल्याला मीरा कुमार यांनी ६० वेळा रोखले आहे असेही सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

सुषमा स्वराज बोलत असताना त्यावेळी लोकसभेतले वातावरण तापलेले दिसून येते आहे. २०१३ मध्ये सत्ताधारी पक्षात बसलेले काँग्रेसचे खासदारही सुषमा स्वराज यांना विरोध करत आहेत. तसेच त्यावेळी लोकसभा अध्यक्ष असलेल्या मीरा कुमार या देखील स्वराज यांना बोलू देत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते आहे.

सध्याच्या घडीला काँग्रेस विरोधी बाकांवर आहे. तर रालोआकडे सत्ता. तसेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक येऊ घातली आहे, अशात मीरा कुमार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी काँग्रेसने दिली आहे. तर रामनाथ कोविंद हे एनडीएचे उमेदवार आहेत. या निवडणुकीत कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. असे असले तरीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा कुमार यांचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पोस्ट करून, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा व्हिडीओ भाजपने त्यांच्या यू ट्युब चॅनेलवर प्रसारित केला आहे. ‘यूपीए सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार’ असे शीर्षक या व्हिडीओला भाजपतर्फे देण्यात आले आहे. व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा असला तरीही त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही.