गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात भरती असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आठवड्याच्या शेवटी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. सुषमा स्वराज यांना त्यांच्या मित्रपरिवार किंवा नातेवाईकांपैकी एकाची किडनी त्यांना दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नोव्हेंबरमध्ये  सुषमा स्वराज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. सुषमा स्वराज यांनी स्वतः या विषयीची माहिती ट्विटरवरुन दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या डायलिसिसवर होत्या. त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी त्यांची चाचणीही सुरु होती. अखेर सुषमा स्वराज यांना किडनी देणारा दाता मिळाला आहे. एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज यांना किडनी दान करणारी व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील नसेल. एम्सच्या डॉक्टरांनी स्वराज यांच्या कुटुंबातील  सर्वांची तपासणी केली होती. मात्र यात किडनी देण्यासाठी आदर्श दाता कोणीही नव्हता. दाता कोण आहे याविषयी गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र किडनी दान करणारी व्यक्ती ही स्वराज यांची नातवाईक किंवा मित्रपरिवारातील असेल असे सूत्रांनी सांगितले.

प्रत्यारोपणापूर्वी करण्यात येणारी सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. स्वराज आणि त्यांना किडनी दान करणा-या व्यक्तीवरही प्रत्यारोपणापूर्वीचे सर्व उपचार झाले आहेत. आता या आठवड्याच्या शेवटी त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे वृत्त येताच भारतासह पाकिस्तानमधूनही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. ट्विटरवर सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणा-या सुषमा स्वराज यांना किडनी दान करण्यासाठी अनेक जण पुढे येत होते. विशेष म्हणजे मूत्रपिंड निकामी झाल्याने स्वराज रुग्णालयात असल्या तरी ट्विटरवर त्यांचे काम सुरुच आहे.