अमेरिकेचा पत्रकार डॅनियल पर्ल याचे सन २००२ मध्ये अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी संशयित आरोपी क्वारी हशीम याची पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शनिवारी पुरेशा पुराव्याअभावी मुक्तता केली. पर्ल डॅनियल याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर जागतिक स्तरावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. हैदराबादच्या मध्यवर्ती तुरुंगात स्थानबद्ध असलेल्या हशीम याच्याविरोधात तेथेच सुनावणी सुरू होती. हशीम याला ऑगस्ट २००५ मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आपल्या अशिलाविरोधात कोणताही पुरावा नव्हता आणि त्यामुळेच फौजदारी कायद्याच्या कलम २६५-क अन्वये हशीम याला मुक्त करण्यासंबंधी आम्ही याचिका केली होती. ती मंजूर झाल्यामुळे आम्हाला मोठे यश मिळाले आहे, असे त्याचे वकील शेर मोहम्मद लेघारी यांनी पत्रकारांना सांगितले.डॅनियल पर्ल आणि मुबारक अली शाह गिलानी यांची भेट घडवून आणल्याप्रकरणी हशीम याला स्थानबद्ध करण्यात आले होते, असे लेघारी म्हणाले.डॅनियल पर्ल याचे सन २००२ च्या जानेवारी महिन्यात अपहरण करून नंतर महिनाभराने त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह कराचीतील कब्रस्थानात सापडला होता. त्याच्या शिरच्छेदाचे चित्रीकरण असलेल्या व्हिडियो टेपही मृतदेहानजिक आढळली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी व ब्रिटनमध्ये जन्मलेला अहमद ओमर सईद शेख याला सध्या हैदराबादच्याच मध्यवर्ती तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे. त्याला २००२ मध्येच मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून या शिक्षेविरोधात त्याने केलेले अपील प्रलंबित आहे.