पाकिस्तानात एका ३२ वर्षे वयाच्या हिंदू डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला असून कराची येथील सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याचा मृतदेह सापडला. अनिलकुमार असे या डॉक्टरचे नाव असून अतिदक्षता विभागातील शस्त्रक्रिया करण्याच्या भागात त्याचा मृतदेह सापडला असल्याचे इदगाह पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नइमुद्दीन यांनी सांगितले.

कुमार हे पहाटे ५.३० वाजता अतिदक्षता विभागात गेले होते व त्यानंतर तीन तासांनी मृतावस्थेत सापडले. दारावर टकटक केली असता आतून प्रतिसाद आला नाही त्यामुळे दार फोडले असता कुमार हे खुर्चीवरच मृतावस्थेत सापडले तेथे जवळच इंजेक्शनची सिरींजही सापडली आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येत असून त्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. त्यांना हाताला इंजेक्शन देण्यात आले असावे कारण हाताला बँडेज बांधण्यात आले होते असे सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह नंतर शवागारात नेला असून त्यांच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांनी राखून ठेवले आहे, कारण काही रासायनिक तपासण्या कराव्या लागणार आहेत. त्यांच्याजवळ सापडलेली सिरींज ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली जाणार आहे. याच आठवडय़ात एका हिंदू उद्योजकाची कुराणाच्या अवमानतेनंतर उसळलेल्या जमावाच्या हिंसाचारात हत्या झाली होती व त्याचा हिंदू मित्र जखमीही झाला होता.