द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांचा सपाटाच लावला आहे. हनिमूनसाठी जाणाऱया जोडप्यांमुळेच केदारनाथला महापूर आल्याचे वक्तव्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.

केदारनाथमध्ये २०१३ साली आलेल्या महाप्रलयात पन्नास हजारांहून अधिक जण दगावले होते. याविषयी बोलताना शंकराचार्य म्हणाले की, हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या ठिकाणी पर्यावरण प्रदूषण आणि धर्माच्या विरोधात कृती केल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. देशाच्या विविध भागातून उत्तराखंडमध्ये नागरिक हनिमून आणि सहलीसाठी येतात. याच कारणामुळे केदारनाथमध्ये प्रलय झाला. अशा कृतींवर निर्बंध न आणल्यास केदारनाथमध्ये पुन्हा निसर्गाचा प्रकोप घडू शकतो.

शनीची दृष्टी महिलांवर पडल्यास बलात्कार वाढतील – शंकराचार्य 

नुकतेच दोन दिवसांपूर्वी शंकराचार्य यांनी साईबाबांविरोधात वक्तव्य करून साई भक्तांचा रोष ओढावून घेतला होता. साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचे त्यांनी म्हटले होते. साईबाबांची पूजा अनुचित असून, त्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. जिथे जिथे अनुचित व्यक्तींची पूजा करणारा समाज असतो. तिथे दुष्काळ पडतो किंवा पूर येतो, नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांचा जीव जातो, अशा घटना वारंवार घडतात. महाराष्ट्रातही या घटना घडत आहेत, असे शंकराचार्यांनी म्हटले होते. याशिवाय, कोणत्याही हिंदूने साईबाबांची पूजा करू नये. घरातून आणि मंदिरातून साईबाबांचे छायाचित्र आणि मूर्ती काढून टाकण्यात यावी, असेही त्यांनी सूचविले होते.