विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांच्या विरोधात बजावण्यात आलेले अटक वॉरंट मागे घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या त्यांच्या वकिलाचा स्विडनच्या वकिलांनी तीव्र विरोध केला आहे.
कथित बलात्कारप्रकरणी असांज यांच्या विरोधात २०१० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. असांज यांच्या वकिलांनी त्यांना सोडण्याची मागणी केली. त्याचबरोबर स्विडन आणि इंग्लंड यांनी असांज यांना डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी इंग्लंड आणि स्विडन यांनी तीव्रपणे याबाबत मत व्यक्त केले. या वेळी फिर्यादी अधिकाऱ्यांनी असांज यांना वर्षभर डांबून ठेवण्याचे काहीच कारण नसल्याचे स्पष्ट केले. ४४ वर्षीय असांज यांनी जून २०१२ मध्ये लंडनमधील इक्वेडेरियन दूतावासात आश्रय घेतला. असांज हे एका गंभीर गुन्ह्य़ातील आरोपी असल्याचे स्विडनमधील फिर्यादी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्टॉकहोम जिल्ह्य़ातील न्यायालय पुढील दोन ते तीन आठवडय़ांमध्ये असांज यांच्या अटक वॉरंटबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. बलात्कार गुन्ह्य़ाप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे स्विडनकडून सांगण्यात येत असले तरी ही बाब असांज यांनी नाकारली आहे.