शब्दाचे स्पेलिंग किंवा व्याकरणात चूक झाली तर थरथरणारी लेखणी तयार केल्याचा दावा ‘लर्नस्टिफ्ट’ या जर्मन कंपनीने केला आहे. तरुण व नवशिक्षितांना लेखनात व्याकरणाच्या चुका टाळता याव्यात, यासाठी या लेखणीची निर्मिती झाली असली तरी सर्वच वयोगटातल्या लोकांना तिचा उपयोग होईल, असे कंपनीचे मत आहे. या लेखणीत सुलेखनात्मक आणि शुद्धलेखनात्मक अशा दोन्ही पर्यायांचा समावेश असेल. सुलेखनात्मक पर्याय निवडल्यास अक्षरलेखन सुवाच्य आणि आकारविल्हे योग्य नसल्यास लेखणी थरथरेल. शुद्धलेखनात्मक पर्यायानुसार लिखाणात व्याकरणदृष्टय़ा चूक झाल्यास लेखणी कंप पावेल आणि तो हाताला जाणवेल. त्यासाठी या लेखणीत सेन्सर्स बसविले आहेत.
ही लेखणी तयार करणारे फॉक आणि मॅण्डी वॉल्स्की यांना त्यांच्या मुलाला शिकविताना अशा लेखणीची कल्पना प्रथम सुचली. लिहिताक्षणीच जर आपली चूक विद्यार्थ्यांना उमगली तर त्यांना सुधारणा करणे सोपे जाते आणि मग त्यांच्या लेखनातील चुकांचे प्रमाणही कमी होऊ लागते, असे या दोघांना वाटते.