बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्य़ाने वाराणसी येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. लच्छू महाराज यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे व त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना  खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या दुखण्याचे कारण हृदयविकाराचा धक्का असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मावळली. लच्छू महाराज यांचे खरे नाव लक्ष्मीनारायण सिंग असे होते. ख्यातनाम तबलावादक असलेले वडील वासुदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी तबला शिकणे सुरू केले आणि त्यात प्रावीण्य मिळवले.

बनारसी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या लच्छू महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते, मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नसल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला होता.