उल्फा’च्या प्रमुखाकडून भेटवस्तू आल्याचा संशय
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येवर आसामच्या नागाव जिल्ह्य़ातील राधाकांत बारुआ उच्च माध्यमिक शाळेला एक अनोखी भेट मिळाली. शाळेतील दोन माजी शिक्षकांच्या स्मृत्यर्थ दूर गावी राहणाऱ्या एका माजी विद्यार्थ्यांने टेबल टेनिसची दोन टेबले भेट म्हणून पाठविली. मात्र हा माजी विद्यार्थी दुसरा-तिसरा कोणी नसून ‘उल्फा’चा अध्यक्ष अभिजीत असोम असल्याचा संशय बळावल्याने आता या शाळेच्या मुख्याध्यापिका, दीप्तीमलिका बारूआ यांच्यामागे एनआयएच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
तथापि, आपल्याकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत असे बारूआ यांचे म्हणणे आहे. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी तयारी करीत असताना ३ सप्टेंबर रोजी आपल्या भ्रमणध्वनीवर एका माजी विद्यार्थ्यांने संपर्क साधला आणि त्याने शाळेला एक भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी दोघा तरुणांनी टेबल टेनिसची दोन टेबले शाळेत आणली. आपण जी खोली दाखविली त्यामध्ये ती ठेवण्यात आली, त्यावर माजी शिक्षक कामेश्वर हजारिका आणि नीलारंजन बोरठाकूर यांच्या स्मृत्यर्थ असे स्टीकर लावण्यात आले होते, असे बारूआ म्हणाल्या.
सदर भेट मुकुल हजारिका यांनी पाठविल्याचे त्या दोघांनी सांगितले. त्यानंतर मुकुल हजारिका हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याची खातरजमा करण्यात आली. मुकुल हा कामेश्वर हजारिका यांचा मुलगा असल्याचेही सिद्ध झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी तीन जण आले आणि त्यांनी माजी विद्यार्थी असल्याचा दावा केला आणि भेटकार्ड दिले त्यावर मुकुल हजारिका यांचे नाव आणि पत्ता होता. एल्टन हाऊस, एल्टन, इंग्लंड, टीएस२११एजी असा त्यावर पत्ता होता.
हजारिका हे १९५५ ते १९६२ या कालावधीत शाळेचे माजी विद्यार्थी होते, असे बारूआ म्हणाल्या.
मात्र त्या कार्डावर दूरध्वनी
क्रमांक अथवा ई-मेल पत्ता
नव्हता.
त्यानंतर हा हजारिका म्हणजे डॉ. अभिजीत बर्मन म्हणजेच अभिजीत असोम हा उल्फाचा प्रमुख असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास सुरू केला. त्यानंतर शाळेने अभिजीत असोमला ३० सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले. ही नोटीस एका नातेवाईकाकडे देण्यात आली. कारण असोम आम्हाला एका खटल्याप्रकरणी हवा आहे, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मात्र मुकुल हजारिका हा अभिजीत असोम असल्याचे उल्फाने खंडन केले आहे. मुकुल हजारिका हा इंग्लंडस्थित मानवी हक्ककार्यकर्ता आहे तर अभिजीत असोम हा आमचा अध्यक्ष आहे, असा खुलासा उल्फाने ई-मेलद्वारे १७ सप्टेंबर रोजी केला.
हजारिका आणि असोम ही एकच व्यक्ती असल्याचा आणखी पुरावा मिळाला असे एनआयएला वाटते, कारण हजारिका याने स्वत: स्पष्टीकरण का केले नाही, असे एनआयएच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. भ्रणणध्वनीवर कोणी दूरध्वनी केला, किती वाजता केला, तो स्थानिक दूरध्वनी होता की परदेशातून आलेला एसटीडी दूरध्वनी होता, टेबले दिली त्यांची नावे काय हे तुम्ही विचारले का, ते कसे दिसतात त्याचे वर्णन करू शकाल का, त्यांनी पावती देण्याची मागणी केली का, भेटकार्ड तुम्हाला कोणी दिले, आदी प्रश्न आता बारूआ यांना विचारले जात आहेत. आता एनआयएने मुख्याध्यापिकांना आलेल्या दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार केली आहे आणि
टेबल टेनिसची टेबले कोठून आणली त्या दुकानाचाही शोध सुरू केला आहे.