आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी कॅनडाहून पाकिस्तानमध्ये परत आल्यानंतर सरकारविरोधी निदर्शकांचे नेते आणि मौलवी ताहिर-उल-कादरी यांनी गेल्या वर्षी पोलिसांच्या छाप्यात मारल्या गेलेल्या आपल्या १४ समर्थकांना न्याय मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली.
लाहोरमधील मॉडेल टाऊनमध्ये झालेल्या संघर्षांच्या वेळी ज्यांनी १४ लोकांना निर्दयपणे ठार मारले, त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्याचे आवाहन मी रेंजर्सचे जबाबदार अधिकारी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे लोक आणि देशातील सुरक्षा संस्था यांना करतो, असे कादरी यांनी  कार्यकर्त्यांपुढे बोलताना सांगितले.
कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तेहरीक (पीएटी) या पक्षाच्या सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी आगमनप्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी लाहोर विमानतळावर गर्दी केली होती. कादरी यांना सुरक्षा पुरवण्यासाठी हजर असलेल्या पक्षाच्या युवक शाखेच्या दीडशे तरुणांसह पंजाब पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
कॅनडाचे नागरिक असलेले कादरी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासह पंतप्रधान नवाझ शरीफ यांची हकालपट्टी करून त्यांचे सरकार खाली खेचण्यासाठी इस्लामाबादेत दोन महिन्यांचे धरणे आंदोलन केले होते.