पाकिस्तानातील नवाझ शरीफ सरकार विरोधात आंदोलन करणारे पाकिस्तान आवामी तेहरीकचे नेते ताहीर-उल-कादरी आणि त्यांच्या पक्षाच्या ७१ कार्यकर्त्यांविरोधात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. दुस-या बाजूला कादरी यांनी नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी न्यायालयाने कादरी यांच्यासह त्यांच्या ७१ सहकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. यापूर्वीच न्यायालयाने कादरी यांच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र, आंदोलनात सहभागी असल्याने पोलिसांना त्यांना हात लावण्याचे टाळले होते. कादरी हे पाकिस्तान तेहरीक ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासह इस्लामाबादमध्ये आंदोलन करत आहेत. पाकमध्ये २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या दोघांनी शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या आंदोलनापासून पाकिस्तानमध्ये विविध शहरांत सरकारविरोधात आंदोलने होत आहेत.