आशिया खंडातील तैवानमध्ये आज (बुधवारी) समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. तैवानच्या न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील तैवान हा पहिलाच देश आहे. त्यामुळे तैवानमधील समलैंगिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या विवाहसंबंधीच्या कायद्यामुळे दोघांचेही वैवाहिक आयुष्य आणि समानतेच्या अधिकार धोक्यात येणार होते. त्यामुळे समलैंगिक विवाहासंबंधी कायदेशीर सुधारणांसाठी न्यायालयाने दोन वर्षांचा कालावधी दिला होता. या दोन वर्षांत या कायद्यातील तरतुदी पूर्ण न झाल्यास समलैंगिक व्यक्ती विवाह करु शकणार होत्या. मात्र त्याआधीच कायदा संमत झाला आहे.

यामुळे तैवानमधील लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना आहे. या निर्णयामुळे भिन्नलिंगी व्यक्तींना विवाहासाठी असणारे सर्व अधिकार समलैंगिक व्यक्तींना मिळणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायाधीशांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या विषयात आंदोलन छेडणारे आणि समलैंगिकांच्या न्यायासाठी लढणारे अगुआ ची यांनी या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता, त्याला अखेर यश आले आहे.

२०१० मध्ये अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदा हा कायदा लागू झाला आणि त्याठिकाणी एका समलैंगिक जोडप्याने विवाह केला होता. त्यानंतर काही देशांमध्ये हा कायदा झाला. ऑस्ट्रेलियामध्येही याबाबतचा कायदा २०१३ मध्ये करण्यात आला होता. मात्र काही कारणाने तो अवघ्या ५ दिवसांत रद्द करण्यात आला होता.