जगभरात समलैंगिक विवाहांचा विषय मोठा चर्चेत असताना तैवानमध्ये या गोष्टीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास समलैंगिक विवाहास मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातील पहिला देश ठरणार आहे. तैवानमधील न्यायालयात या विषयावर आज निर्णय होणार आहे.

तैवानमध्ये मागील काही काळापासून समलैंगिक विवाहाला मान्यता मिळायला हवी यासाठी मोठा दबाव निर्माण होतो आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागेल अशी आशा समलैंगिक कार्यकर्त्यांना आहे. मात्र समाजातील ठराविक गटाकडून या विषयाला विरोध होताना दिसत आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाल्यास समाजावर त्याचे वाईट परिणाम होतील, असे या गटाचे मत आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी विरोधकांकडून देशाच्या विविध भागात काही रॅलींचेही आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजता या निर्णयाचा निकाल लागणार असून तो ऑनलाईन पोस्ट केला जाईल असे येथील संबंधित यंत्रणेने कळविले आहे. आशियाई देशांच्या आणि जगाच्याही दृष्टीने हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल असल्याने त्याकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहीले आहे.

या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायधीशांचे पॅनेल करण्यात आले आहे. ते सर्व गोष्टींचा योग्य तो अभ्यास करुन निर्णय देतील, असे सांगितले जात आहे. या विषयात आंदोलन छेडणारे आणि समलैंगिकांच्या न्यायासाठी लढणारे अगुआ ची यांनी या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता. मागील ३० वर्षांपासून या विषयात लढत असलेल्या ची यांना न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनी लागेल असा विश्वास आहे. त्यामुळे तैवानसारख्या आशियाई देशामध्ये या खटल्याचा निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.