ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी उडी घेतली आहे. ‘एक-दोन मुघल बादशाह सोडले तर बाकी सर्व विलासी होते. त्यामुळे मुसलमानांनी त्यांना आदर्श मानू नये’, असे रिझवी यांनी म्हटले आहे.


‘एएनआय’शी बोलताना रिझवी म्हणाले, ‘ताजमहाल प्रेमाचे प्रतिक होऊ शकतो, मात्र पूजेचे प्रतिक होऊ शकत नाही. देशातील एक-दोन मुघल सोडले तर बाकीचे विलासी होते. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांना आदर्श मानू नये.’ तसेच रामाच्या मूर्तीबाबत ते म्हणाले, ‘राममूर्तीला होत असलेला विरोध दुःखदायक आहे. अयोध्या हिंदू परंपरेचे केंद्र आहे. त्यामुळे हे एक चांगले पाऊल आहे. ज्यावेळी उत्तर प्रदेशात मायावतींनी स्वतःचा पुतळा उभारला, तेव्हा त्याला कोणीही विरोध केला नव्हता. त्यामुळे रामाच्या मूर्तीवरून एवढा वाद का होतो, हेच कळत नाही, असे रिझवी म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक प्रस्ताव पाठवला असून, अयोध्येत तयार होणाऱ्या रामाच्या १०० मीटर उंचीच्या मूर्तीसाठी चांदीचे बाण भेट देणार असल्याची घोषणा केली आहे. काही शिया मुस्लिमांनी वक्फ बोर्डाच्या माध्यमांतून हे चांदीचे बाण भेट देण्याची कल्पना मांडली होती.

ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील डाग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार संगीत सोम यांचे काही भाजप नेत्यांनी समर्थन केले आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने यावर सावध भूमिका घेतली. ताजमहाल कोणी उभारला यापेक्षा तो उभारण्यासाठी भारतीय मजुरांनी आपले रक्त आणि घाम गाळला हे जास्त महत्वाचे आहे. सोम यांचे हे वैयक्तिक विचार असून, त्याला राज्य सरकारचे समर्थन नाही, असे योगींनी म्हटले होते. आमचे सरकार राज्यातील ऐतिहासिक वारशांच्या जतनासाठी सतत प्रयत्नशील आहे. तसेच राज्याच्या प्रत्येक ऐतिहासिक स्मारकाला पर्यटन योग्य बनवण्याचे काम सुरु असल्याचेही योगी म्हणाले होते.