गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आक्रमणामुळे ताजमहाल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घेतल्यापासून कायमच ताजमहाल ही परकीय राज्यकर्त्यांची निशाणी असल्याचे सांगत या वास्तूला डावलण्याचा प्रकार सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

‘बहुतांश मुघल बादशाह विलासी होते; मुस्लिमांनी त्यांना आदर्श मानू नये’

मात्र, या राजकीय वादामुळे ताजमहालची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. सध्याच्या घडीला ताजमहाल हे देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या महसुलाच्या आकडेवारीवरून ही बाब सिद्ध झाली आहे. याशिवाय, गेल्यावर्षी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत सादर केलेली आकडेवारीही ताजमहालची लोकप्रियता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ताजमहालात प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यानुसार ताजमहाल देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ ठरले आहे. या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून ताजमहालने २१.२३ कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ कमाईच्याबाबतीत आग्रा किल्ला ( १०.५८ कोटी), लाल किल्ला (५.९७४ कोटी) , हुमायूनची कबर ( ६.३५५५ कोटी) आणि कुतुबमिनार (१०.२९ कोटी) या पर्यटनस्थळांचा क्रमांक लागतो.

‘गद्दारांनी बांधलेल्या लाल किल्ल्यावरुन झेंडावंदन करणे मोदी बंद करणार का?’

योगी आदित्यनाथ यांनी कालच ताजमहालच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. ताजमहाल कोणी बांधला आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो भारतीय मजुरांच्या घामातून उभारला गेला, हे महत्त्वाचे आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ताजमहाल परिसरात सोयीसुविधा पुरवणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. योगी आदित्यनाथ २६ ऑक्टोबरला आग्र्याला भेट देणार आहेत. त्यावेळी ते ताजमहाललाही भेट देतील.