भारतामध्येच दडवून ठेवलेला काळा पैसा शोधून काढण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेश सोमवारी केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाला दिला. यासाठी फसव्या गुंतवणूक योजना, बनावट आयपीओ यांच्यावर जवळून लक्ष ठेवण्याची सूचनाही प्राप्तिकर विभागाला करण्यात आली आहे.
परदेशात आणि देशात वेगवेगळ्या पद्धतीने लपवून ठेवलेला काळा पैसा शोधून काढण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय महसूल विभागाचे सचिव शक्तीकांत दास यांनी सांगितले. प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या वार्षिक परिषदेत त्यांनी काळा पैशाबद्दल सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. परदेशातील काळा पैसा उजेडात आणण्यासाठी संसदेने नुकतेच एक विधेयक मंजूर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शक्तीकांत दास म्हणाले, देशात दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आणण्यावर आपण विशेष भर दिला पाहिजे. यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. पण मला असे वाटते की, कोणीतरी आकर्षक पण फसव्या गुंतवणूक योजना आणत असेल, तर त्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही नियमनाशिवाय गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱया योजनांवरही लक्ष ठेवले पाहिजे. अशा योजना दिसल्यास त्यासंदर्भात संबंधित विभागाला तातडीने माहिती दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.