हक्कानी नेटवर्कवर समाधानकारक कारवाई केल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्याने पाकिस्तानची ३० कोटी डॉलर्सची मदत अमेरिकेने रोखली असतानाच दहशतवाद्यांवर कारवाई करणे पाकिस्तान व अमरिकेच्या हिताचे आहे, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.

हक्कानी नेटवर्कने अफगाणिस्तानात अमेरिकेशी संबंधित संस्थांवर हल्ले करून अनेकदा अपहरणेही केली होती. हक्कानी नेटवर्कने अफगाण सरकार व तेथील नागरिकांनाही लक्ष्य केले होते. अफगाणिस्तानातील भारतीयांचा समावेश असलेल्या आस्थापनांवरही हल्ले करण्यात आले होते. काबूलमधील २००८ मध्ये भारतीय दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ५८ जण ठार झाले होते.

पेंटॅगॉनने म्हटले आहे, की दहशतवादी गटांवर कारवाई करणे हे पाकिस्तानच्या हिताचे आहे. पाकिस्तानशी आमचे संबंध निकटचे आहेत, त्यात दहशतवाद विरोधाचा भाग जास्त आहे. त्यामुळे त्या देशाने दहशतवाद्यांवर कारवाई करणे महत्त्वाचे आहे. पेंटॅगॉनचे प्रसिद्धी सचिव पीटर कुक यांनी सांगितले, की पाकिस्तानने दहशतवादाविरोधातील कारवाई तीव्र करावी. अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी हक्कानी नेटवर्कवर समाधानकारक कारवाई केल्याबाबत पाकिस्तानला प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणाऱ्या ३० कोटी डॉलर्सच्या मदतीवर पाणी सोडण्याची वेळ आली होती. जून ३० ही त्या मदतीसाठी मुदत होती.

आता ती पाकिस्तानला मिळू शकलेली नाही त्यामुळे त्या पैशांचा विनियोग इतर कारणांसाठी करावा लागणार आहे. पाकिस्तान दहशतवादाविरोधात प्रयत्न करीत आहे, असे पेंटॅगॉनचे प्रसिद्धी सचिव कुक यांनी सांगितले. मदत रोखणे हा अमेरिका पाकिस्तान यांच्यातील मैत्रीला मोठा हादरा आहे, असे मदत रोखल्याचे वृत्त प्रथम देणाऱ्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.