पाकिस्तानी तालिबानने जून २०१० मध्ये अपहरण केलेल्या फ्रंटियर कमांडच्या २३ सैनिकांची निर्घृण हत्या केली असून त्यानंतर पाकिस्तान सरकारने तालिबानशी शांतता बोलणी स्थगित केली आहेत. ‘तेहरीक ए तालिबान पाकिस्तान’ या संघटनेबरोबर वाटाघाटी होणार असतानाच तालिबानच्या एका गटाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात फ्रंटियर कमांडच्या २३ अपह्रत सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला. त्यावर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या कृत्याचा निषेध केला असून शांतता प्रक्रियेत घातपात करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा आता शांतता प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होईल. पाकिस्तानला रक्तपात परवडणारा नाही असे त्यांनी सांगितले. आम्ही अतिशय गंभीरपणे तालिबानशी चर्चेत सहभागी होण्याचे ठरवले होते. सर्वपक्षीय बैठक घेऊनच तालिबानशी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.कराचीत अलिकडेच १३ पोलिसांना तालिबानने ठार केले होते व आता त्यांनी २३ जवानांना ठार केल्याचे जाहीर केले आहे. ही संतापजनक बाब असल्याचे सुरक्षा संस्थांमधील अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.
शांतता चर्चेतील सरकारचे प्रमुख इरफान सिद्दिकी यांनी सांगितले की, तालिबानशी सुनियोजित बैठका घेऊन वाटाघाटी करण्यात काही अर्थ नाही, आपण योग्य दिशेने चाललेलो नाही याचे वाईट वाटते.

पाकिस्तानी प्रदेशात सैन्य पाठविण्याचा इराणचा इशारा
तेहरान : बंडखोर गटांनी पकडून ठेवलेल्या सीमा सुरक्षा जवानांच्या सुटकेसाठी वेळप्रसंगी इराण आपले सैन्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या प्रदेशात पाठवेल, असा इशारा तेहरानच्या अंतर्गत मंत्र्यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर पाच सीमा सुरक्षा जवानांना ताब्यात घेतल्याचा दावा करणारी छायाचित्रे जैश अल अदल या बंडखोर गटाने ट्विटरवर टाकल्यानंतर अब्दोलरेझा रहमानी फजली यांनी हा इशारा दिला आहे. पाकिस्तानने हे प्रकरण गंभीरपणे आणि प्राधान्याने हाताळावे अन्यथा सैन्य कारवाईबाबत इराणला परवानगी द्यावी, असे फजली यांनी म्हटले आहे.  पाकिस्तानने योग्य कार्यवाही केली नाही, तर इराणच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला योग्य वाटेल ती कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

‘त्यांचा’ दावा खोटा
तालिबानने आदिवासी भागातील दहशतवाद्यांवरील कारवाईचा बदला घेण्यासाठी २३ जवानांना ठार केल्याचा दावा केला असला तरी सुरक्षा दलांच्या ताब्यात असलेल्या एकाही दहशतवाद्याचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना मारल्यामुळे बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे तालिबानचे समर्थन योग्य नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.