पूर्व अफगाणिस्तानात अमेरिकेचे मालवाहूतक विमान पाडण्यात आले, त्यात ११ जण ठार झाले असून त्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा समावेश आहे. हे विमान आम्हीच पाडले असा दावा तालिबानने केला आहे. नाटो व दहशतवादी यांच्यातील वैमनस्य पराकोटीला पोहोचले असून उत्तर अफगाणिस्तानातील कुंडूझ शहर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानात नाटोची नाचक्की झाली. एअर फोर्स ‘सी १३० जे’ हे विमान जलालाबाद येथील हवाई क्षेत्रात कोसळले असून ती त्याची ४५५ वी खेप होती.  सहा अमेरिकी सैनिक व पाच नागरिक यात मरण पावले आहेत. हे विमान सी १३० हक्र्युलिस प्रकारचे मालवाहू विमान असून लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केलेले आहे. त्यात टबरेप्राप इंजिने वापरली आहेत.

पेंटॅगॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याने विमान कसे पडले याबाबत काहीच ठामपणे सांगितले नाही, पण तालिबानने आम्हीच ते पाडले असा दावा केला आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी चालू आहे असे पेंटॅगॉनच्या निवेदनात म्हटले आहे.

उत्तर अफगाणिस्तानात कुंडूझ शहराचा ताबा घेण्यावरून नाटो दले  व तालिबान यांच्यात धुमश्चक्री सुरू असून हे शहर तालिबानच्या ताब्यात आहे. ते परत घेण्यासाठी नाटोची मदत असलेली अफगाणी सैन्यदले मदत करीत आहे. कुंडुझ शहर तालिबानने सोमवारी ताब्यात घेतले आहे.