‘पाकिस्तानातून तात्काळ चालते व्हा, नाहीतर हिंसाचाराला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा पाकिस्तानी तालिबानने देशातील परदेशी नागरिकांना दिला आहे. उत्तर वाझिरिस्तानमधील दुर्गम भागात अमेरिकेने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केल्याने पाकिस्तानी तालिबानने हा इशारा दिला आहे.
तेहरिक-ई-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या पाकिस्तानस्थित तालिबानी संघटनेचा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहीद याने सोमवारी याबाबत माहिती दिली. ‘‘उत्तर वाझिरिस्तानमधील दुर्गम भागात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी पाकिस्तानी नागरिकांची इच्छा आहे. मात्र तिथे लष्करी मोहिमा राबवल्या जात असून, पाश्चिमात्य देश याचा आनंद घेत आहेत,’’ असे शाहीद म्हणाला.
‘‘पाकिस्तानातील सर्व आंतरराष्ट्रीय यंत्रणा, परदेशी विमान वाहतूक सेवा आणि गुंतवणूकदारांना इशारा देण्यात येत आहे की, तात्काळ त्यांनी पाकिस्तानातील सर्व व्यावसायिक संबंध तोडून टाका आणि या देशातून चालते व्हा. त्यांनी तसे न केल्यास देशभरात मोठे हिंसाचार घडविले जातील आणि त्याला जबाबदार देशातील सर्व परदेशी संघटना किंवा परदेशी व्यक्ती असतील,’ असा इशारा शाहीदने दिला आहे.’’
पाकिस्तानाशी व्यावसायिक संबंध ठेवून पैसे कमविले जातात आणि याच पैशाचा वापर दुर्गम भागातील लष्करी मोहीम राबविण्यासाठी केला जातो. दुर्गम भागातील मुस्लीम नागरिकांना लक्ष्य करणे याच हेतूने या मोहिमा राबविल्या जातात, असेही शाहीदने सांगितले.
पाकिस्तानच्या दुर्गम भागात संचारबंदी
पाकिस्तानच्या उत्तर वाझिरीस्तान या दुर्गम भागात दहशतवादी कारवाया वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी आणि सैन्यदलाने तिथे चोख बंदोबस्त ठेवला असून, दिसता क्षणी गोळय़ा झाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या भागातील स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मिरनशाह शहराजवळील सराई दर्पा खेल या गावात संचारबंदी उल्लंघन केल्याने सैनिकांनी गोळीबार केला आणि त्यात दोन जण जखमी झाले.
अमेरिकेने उत्तर वाझिरीस्तान भागात ड्रोन हल्ले केल्यानंतर या भागातील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. जागोजागी सैनिकांनी पहारा वाढविला आहे. पाकिस्तानी तालिबानी दहशतवाद्यांचे अड्डे शोधून काढून त्यांच्यावर सैनिकांकडून कारवाई करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त करण्याची मोहीमही सैनिकांतर्फे सुरू आहे.

कारवाईत २७ दहशतवादी ठार
उत्तर वाझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबान्यां विरोधात पाकिस्तान लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. लष्कराच्या हल्ल्यात सोमवारी २७ दहशतवादी ठार झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारने दिली. उत्तर वाझिरीस्तानाच्या दुर्गम भागातील दहशतवाद्यांचे अड्डे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शॉल परिसरातील दहशतवाद्यांच्या अड्डय़ांवर सोमवारी हवाई दलाच्या विमानांनी हल्ले करण्यात आले. हे सर्व अतिरेकी उझबेकिस्तानचे रहिवासी होते.