अफगाणिस्तानमध्ये १९९६ ते २००१ पर्यंत तालिबानची एकहाती राजवट आणणारा म्होरक्या मुल्ला ओमर दोन ते तीन वर्षांपूर्वीच ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याचे अफगाणिस्तानचे सरकार व काही सूत्रांच्या हवाल्याने बीबीसी वृत्तवाहिनीने ओमर ठार झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती दाखविण्यात आली नसल्याने साशंकता निर्माण झाली आहे.
यावर या वाहिनीच्या प्रतिनिधीने तालिबानच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा खुलासा लवकरच केला जाईल, असे सांगितले. ईदच्या सायंकाळी ओमरचा संदेश असलेली चित्रफीत तालिबानने प्रसारित केली होती. यामध्ये त्याने अफगाण सरकारला शांततेचे आवाहन करत १३ वर्षांपासूनचे युद्ध थांबविण्याची विनंती केली होती. ओमर ठार झाल्याच्या बातम्या यापूर्वीही अनेकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र प्रथमच बीबीसीने अफगान सरकारचा हवाला देत ओमरच्या मृत्यूचा दावा केला आहे
संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने २००१ मध्ये तालिबानची राजवट उलथवून लावल्यानंतर ओमर भूमिगत झाला होता.