अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी रात्री सलमा धरणावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सुमारे १० पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. या हल्ल्यात ४ दहशतवाद्यांचा खात्माही करण्यात आला आहे. भारताच्या सहकार्याने सलमा धरण बांधण्यात आले आहे. गतवर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात १० पोलीस ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातील चश्ता जिल्ह्यातील एका चौकीवर हल्ला केल्यानंतर सलमा धरणाला लक्ष्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांचे हत्यारे घेऊन पळ काढला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. यात चार दहशतवादीही ठार झाले. तालिबानकडून अजून या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

सलमा धरणास भारत आणि अफगाणिस्तानच्या ‘मैत्रीचे धरण’ ही म्हटले जाते. पंतप्रधान मोदींनी गत वर्षी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्याबरोबर याचे उद्घाटन केले होते. दोन्ही देशातील संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी सलमा धरणाचे नाव बदलून भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे धरण असे नामकरण करण्यात आले होते.