पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करुन मी चुकलोच अशी कबुलीच अभिनेते कमल हसन यांनी दिली आहे. आता मोदींनीही या निर्णयासाठी माफी मागितल्यास मी त्यांना सलामच करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. यानुसार पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या. नोटाबंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असला तरी अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. यात अभिनेता कमल हसन यांचा समावेश होता. मात्र आता कमल हसन यांनी यू- टर्न घेतले असून एका तामिळ मासिकातील लेखात याविषयी स्पष्टीकरण दिले. ‘स्वतःची चूक मान्य करणे ही चांगल्या नेत्याची ओळख असते. महात्मा गांधींनीही हेच केले होते. आता मोदींनीही चूक मान्य करुन जनतेची माफी मागावी, त्यांनी माफी मागितल्यास मी सलाम करेन’, असे हसन म्हणालेत.

‘मी नोटाबंदीचे समर्थन करण्याची घाई केली, यामुळे काळा पैशांवर चाप बसेल अशी आशा होती. पण मी चुकलो. अर्थशास्त्राविषयी जाण असलेल्या माझ्या अनेक मित्रांनी माझ्यावर टीका केली होती’, असे हसन यांनी सांगितले. आता मी स्वतःची समजूत काढतो की निर्णय योग्य होता, फक्त अंमलबजावणी योग्य नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी कमल हसन यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. मी मोदींना सलाम करतो, पैसे कमवूनही कर चुकवणाऱ्यांना हादरा बसला, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. काही दिवसांपूर्वीच कमल हसन यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. दिल्लीत कमल हसन यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट देखील घेतली होती.