तामिळनाडूत पावसाने मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारने पूरग्रस्तांना ताबडतोब ९४० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली होती त्यावर लगेच कार्यवाही करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूला ९३९.३३ कोटी रुपये तातडीने मंजूर केले आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूला एक पथक पाठवणार असून त्या अहवालानंतर आणखी मदत दिली जाईल. ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडूत मोठा पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की राज्यात ८४८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून मदत कार्य सुरू करण्यासाठी तातडीची २००० कोटींची मदत मंजूर करण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. तामिळनाडूत १ ऑक्टोबर २०१५ पासून सुरू असलेल्या पावसात १६९ जण मरण पावले आहेत. केंद्र सरकारने नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवावे असेही राज्य सरकारने म्हटले आहे. पूरग्रस्तांसाठी लागणारा पैसा हा राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा खूप अधिक आहे त्यामुळे केंद्र सरकारने तातडीची मदत जाहीर करावी, असे जयललिता यांनी पत्रात म्हटले होते.

तामिळनाडू किनाऱ्यावर मराखन्नम येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कडलोर, कांचीपुरम, चेन्नई व तिरूवल्लूर येथे खूप पाऊस झाला आहे. हवामान खाते, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रशासनाने मालमत्तेची हानी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. सर्व प्रयत्न करूनही राज्यात मोठी हानी झाली आहे.

शतकातील सर्वाधिक पाऊस
कडलोर जिल्ह्य़ात नेवेली येथे ९ नोव्हेंबरला ४३७ मि.मी. पाऊस झाला होता. चेन्नईत शंभर वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. १ ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सूनचा हा पाऊस सुरू झाला आहे.