चेन्नईतील मरीना समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून निदर्शने करणाऱ्या गर्दीकडे वरकरणी पाहिले तर जल्लिकट्टू खेळ पुन्हा सुरू करण्यासाठीचे हे आंदोलन वाटू शकते. मात्र गर्दीतील निदर्शकांशी सविस्तर संवाद साधल्यावर जाणवते की जल्लिकट्टू हे केवळ निमित्त आहे, वस्तुत: हा तामिळनाडूच्या सामान्य जनांच्या मनात अनेक वर्षे खदखदत असलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे.

मरीना बीचवर गेल्या मंगळवारपासून आंदोलन सुरू करणाऱ्या पहिल्या ५० व्यक्तींपैकी ए. सी. पी. झिन्ना हे एका खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर काम करतात. ते म्हणतात, सध्याच्या आंदोलनाचे जल्लिकट्टू हे तत्कालिक कारण आहे. मात्र हा जनतेच्या मनात अनेक वर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. काही दिवस थांबा आणि तुम्हाला याच ठिकाणी शेतकरी आणि कष्टकऱ्यांची निदर्शने होताना दिसतील. ही युवा चळवळ आता कुठे सुरू होत आहे.

मदुराईच्या रहिवासी असलेल्या जी. दुर्गादेवी चेन्नईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहेत. त्याही या आंदोलनात सहभागी आहेत. त्यांच्या मते हे आंदोलन प्रामुख्याने प्रस्थापित रजकारणी आणि त्यांच्या गलिच्छ राजकारणाविरुद्ध आहे. आम्हाला राजकारणात कधीच प्रतिनिधित्व नव्हते. आमच्यावर कायम अन्यायच होत आला आहे. राजकारण्यांनी काही सवलतींचे तुकडे आमच्या तोंडावर फेकून आम्हाला भिकाऱ्यासारखे वागवले. आमच्या गरजा कायम त्यांनीच ठरवल्या, असे त्या म्हणाल्या.

याप्रमाणे अनेक आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातून जाणवले की जल्लिकट्टू हे केवळ तात्कालिक कारण आहे. आजवर राज्यातील आणि केंद्रातील राजकीय पक्षांनी केलेले दुर्लक्ष आणि पिळवणूक श्रीलंकेतील तामिळ नागरिकांच्या लढय़ाच्या अखेरच्या टप्प्यात केंद्राने घेतलेली भूमिका, कावेरी पाणीवाटप प्रश्नी दुर्लक्षिले जाण्याची भावना; कुडनकुलम अणुप्रकल्प, ‘गेल’चा पाइपलाइन प्रकल्प, शेतकऱ्यांचे आंदोलन, राज्यातील दुष्काळ, चेन्नईतील पूर, तामिळनाडूच्या मच्छीमारांचे प्रश्न या सर्व बाबतीत सरकारने सतत दाखवलेली अनास्था या सगळ्यांबाबतचा हा सामुदायिक आणि स्वयंस्फूर्त उद्रेक आहे.

न्यूयॉर्क फिल्म अकादमीतून पदवी ग्रहण केलेले चंद्र मोहन हे आंदोलनाच्या समन्वयकांपैकी एक आहेत. त्यांनी सांगितले, तरुण स्वार्थी, आत्मकेंद्री आणि राजकारणापासून अलिप्त आहेत हा समज या आंदोलनाने खोडून काढला आहे. वर्षांनुवर्षे साचून राहिलेल्या असंतोषाला आता यानिमित्ताने वाचा फुटत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांना जनता विटली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीने आणि नोटाबंदीच्या निर्णयाने जनतेला मोठा त्रास होत आहे. बेकारीने तरुण त्रस्त आहेत. लोकांना आपले सांस्कृतिक दमन झाल्यासारखे वाटत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या रामजयम यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले, की डाव्या विचारांचे गट, कार्यकर्ते, महिला आणि प्राणी हक्क संघटना आदी सुधारणावादी घटक या प्रश्नाकडे संकुचित नजरेतून पाहतात. त्यांना वाटते की जल्लीकट्टू हा प्राण्यांवर अन्याय करणारा खेळ असल्याने सध्याच्या जगात तो अप्रस्तूत आहे. या खेळाचे आयोजन प्रामुख्याने शेतीवर नियंत्रण असलेल्या थेवर समाजाकडून होते आणि त्यादरम्यान अनेकदा दलितांवर हल्ले झाले आहेत. या कारणानेही जल्लीकट्टूला विरोध आहे. हे खरे आहे की जल्लिकट्टू हे या आंदोलनाचे तात्कालिक कारण आहे. पण ते अर्धसत्य आहे. त्याच्याशी संबंधित सामाजिक संदर्भाचा विचार करण्यात ही मंडळी कमी पडतात. यानिमित्ताने झालेला हा सामान्य जनतेच्या मनातील असंतोषाचा उद्रेक आहे.

तामिळींचा राष्ट्रवाद धोकादायक नाही-शिवकुमार

हिंदी भाषेला विरोध म्हणून १९६५ साली झालेल्या द्रविडी आंदोलनात सहभागी झालेले तामिळ अभिनेते शिवकुमार यांच्या मते अनेक लोक समजतात तसे हे तामिळ राष्ट्रवादाचे आंदोलन नाही. लोकांनी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यात काही गैर नाही. तामिळींचा राष्ट्रवाद हा बराचसा सांस्कृतिक आहे आणि तो धोकादायक नाही.

 

पाचव्या दिवशी निदर्शने

चेन्नई : जलीकट्ट सुरू करण्यासाठी केंद्र  सरकारने अध्यादेश काढण्याची परवानगी देऊनही शनिवारी तामिळनाडूत निदर्शने करण्यात आली. मरिना बीच हे आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. तेथे अनेक तरूण व विद्यार्थ्यांनी घोषणाफलक घेऊन आंदोलन केले. मरिना बीचचा परिसर गजबजून गेला होता.

जलीकट्टू समर्थकांनी मदुराई येथे रेल रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दक्षिण रेल्वेने अनेक गाडय़ा रद्द केल्या असून काही गाडय़ा दुसऱ्या मार्गाने वळवल्या आहेत. केंद्र सरकारने काल जलीकट्टूला परवानगी देण्याबाबत अधिसूचनेच्या मसुद्यास मंजुरी दिली असून तामिळनाडू सरकार अध्यादेश काढणार आहे. अलनगानलूर, थेनी, दिंदीगुल, रामनाथपुरम, कन्याकुमारी व दक्षिण तामिळनाडूत अनेक ठिकाणी निदर्शने झाली. मदुराईत रेल रोको करण्यात आले. थेनी येथे लोकांनी कोंबडय़ांची झुंज ठेवली  होती.

 

तामिळनाडूच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणाम

नवी दिल्ली : केंद्राने तामिळनाडूच्या आशाआकांक्षांकडे व हिताकडे दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा अद्रमुकने दिला आहे.

अद्रमुक खासदारांचे जे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटले त्याचे नेते व लोकसभेचे उपसभापती एम तंबीदुराई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्र सरकारने राज्याला जलीकट्टूच्या प्रश्नावर अध्यादेश काढण्याची परवानगी दिली आहे ते चांगलेच झाले, पण केंद्र सरकार तामिळनाडूच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे हे योग्य नाही. ‘एक देश एक कर’ हे जीएसटीसाठी ठीक आहे, पण ‘एक भाषा एक संस्कृती’ हे संघराज्यवादासाठी योग्य नाही. पंतप्रधान सहकारात्मक संघराज्यवादाची भाषा करतात, पण आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाहीत तर त्याला काही अर्थ नाही. तामिळनाडू सरकारने कावेरी, मुल्लापेरियार, कचाथिवू, तामिळ मच्छीमार, श्रीलंकन तामिळींचा प्रश्न व जलीकट्टू हे प्रश्न उपस्थित केले. जलीकट्टूचा प्रश्न तामिळ संस्कृतीशी निगडित आहे. आमच्या प्रादेशिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा आम्ही केंद्र सरकारला देत आहोत, असे तंबीदुराई म्हणाले.

 

आकांक्षापूर्तीचे प्रयत्न-मोदी

नवी दिल्ली : तामिळनाडूतील लोकांच्या सांस्कृतिक आशाआकांक्षांची पूर्तता करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की तामिळनाडूच्या समृद्ध संस्कृतीचा आम्हाला अभिमान वाटतो व त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. केंद्र सरकार तामिळनाडूच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असून, त्या राज्याने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करावीत असेच आम्हाला वाटते.