मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम आज पंतप्रधानांना भेटणार

जलीकट्टमूवरील (बैलांच्या शर्यती) बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे धास्तावलेले मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे गुरूवारी अण्णाद्रमुकच्या ५१ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जलीकट्टूवरील बंदी उठवावी, अशी मागणी ते करणार आहेत.

जल्लीकट्ट हे तमिळ संस्कृतीचे प्रतीक असून, त्यावरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हजारो लोकांनी मरीना समुद्र किनाऱ्यावर एकत्र येऊन जलीकट्टुच्या समर्थनार्थ निदर्शने केली. तमुक्कममध्ये या मागणीसाठी तीन विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बैलांना मोकाट सोडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. जलीकट्टुविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेविरोधातही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.

निदर्शनांना अभिनेते सुरिया शिवकुमार व विजय यांनी पाठिंबा दिला आहे. जलीकट्टूला विरोध केल्याबद्दल ‘पेटा’वरही टीका केली आहे. जलीकट्टू ही तामिळनाडूची  खरी ओळख असल्याचे विजय याने सांगितले.  तर जलीकट्टूमुळे देशी बैलांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका नाही असे सुरिया यांनी म्हटले आहे. जलीकट्टूवर बंदी घातल्याने बैलांच्या देशी प्रजातींना संरक्षण मिळेल हा दावा सुरियाने फेटाळून लावला आहे.  जलीकट्टूवरील बंदीविरोधात राजकीय मतभेद विसरून निदर्शने होत आहेत. पेटा संघटनेवर बंदी घातली तर तामिळनाडूतील लोकांना आनंदच होईल, असे विजय यांनी म्हटले आहे. याआधी सुपरस्टार रजनीकांत व कमल हसन यांनीही जलीकट्टूचे समर्थन केले होते.