तामिळनाडूत बस स्टँडचे छत कोसळून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तामिळनाडू सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना साडेसात लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

नागापट्टणम जिल्ह्यातील पोरेयार बस डेपोतील कर्मचारी विश्रामगृहात आराम करत होते. बस डेपोतील इमारत ७० वर्षे जुनी असून शुक्रवारी सकाळी इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला या दुर्घटनेत आठ कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व कर्मचारी हे तामिळनाडू परिवहन विभागात कंडक्टर पदावर कार्यरत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच डेपोच्या आवारात कर्मचारी आणि स्थानिकांची गर्दी झाली.

घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री एम आर विजयभास्कर यांना कर्मचाऱ्यांनी घेराव घातला. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. परिवहन मंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दुपारी मृत कर्मचाऱ्यांना साडेसात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना दीड लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. इमारतीचे बांधकाम जुने झाल्याने डागडुजी करण्याची मागणी २००५ मध्येच केली होती. मात्र मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ९ कर्मचाऱ्यांचा बळी गेला, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.