कमल हसन पाठोपाठ तामिळ सिनेसृष्टीतील आणखी एक अभिनेता भाजपच्या रडारवर आहे. अभिनेता विजयचा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘मर्सल’ चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटात वस्तू आणि सेवा कर, डिजिटल इंडियावर टीका केल्याने भाजपने चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

अभिनेता विजयचा ‘मर्सल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची तामिळनाडूत सर्वत्र चर्चा आहे. विजयच्या चाहत्यांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, विजयच्या चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील काही दृश्ये जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण करु शकतात आणि त्यामुळे ती दृश्ये वगळण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टीएन सौंदरराजन यांनी केली आहे.

‘मी हा चित्रपट बघितला नाही, मात्र या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये डिजिटल इंडिया आणि जीएसटीबाबत चुकीची माहिती दिली’ असा आरोप त्यांनी केला. अभिनेता विजयला आता राजकारणात प्रवेश करण्याचे वेध लागल्याने त्याने या दृश्यांचा समावेश केला असावा, असे सौंदरराजन यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूतील राजकारणात  सिनेसृष्टीतील कलाकारांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी सक्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते.

कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप?
चित्रपटातील दोन दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे. यातील पहिल्या दृश्यात पाकिटमार चित्रपटातील नायक अर्थात विजयचा खिशातील पाकिट चोरतो. पण डिजिटल इंडियामुळे पाकिटात पैसे नाही, असे या दृश्यात म्हटले आहे. तर दुसऱ्या दृश्यात नायकाने सिंगापूर आणि भारतातील जीएसटीची तुलना केली आहे. सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी असून तिथे लोकांना मोफत उपचार मिळतात. पण भारतात २८ टक्के जीएसटी भरुनही लोकांना मोफत उपचार मिळत नाही, असे नायक म्हणतो.