विधानसभेतील धक्काबुक्की, गोंधळात तामिळनाडूतील राजकीय नाटय़ संपुष्टात

तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासूनचे राजकीय नाटय़ शनिवारी संपुष्टात आले खरे; पण नव्या वादाला तोंड फुटले. धक्काबुक्की आणि प्रचंड गोंधळानंतर विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांनी जिंकला. मात्र गोंधळी सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याने द्रमुकने आक्रमक भूमिका घेतली. यामुळे द्रमुक आणि बंडखोर ओ. पन्नीरसेल्वम यांच्या विरोधाचा सामना करीत सरकार चालविण्याची कसरत पलानीस्वामी यांना करावी लागणार आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची आणि सरकारची सूत्रे हाती घेण्यासाठी सरसावलेल्या व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात ओ. पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी आपले विश्वासू इडापडी पलानीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी वर्णी लावली. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शनिवारीच बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विधानसभेचे कामकाज सुरू होताच पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावावर गुप्त मतदान घ्यावे आणि आमदारांना मतदानाआधी आपापल्या मतदारसंघातील लोकभावना जाणून घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.

मात्र विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे द्रमुकच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या वेळी धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. अखेर या गोंधळी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यापाठोपाठ काँग्रेस सदस्यांनीही सभात्याग केला. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने १२२, तर विरोधात फक्त ११ मते पडली.

मतदानाच्या वैधतेवर शंका -पन्नीरसेल्वम

ओ. पन्नीरसेल्वम यांनी विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वैधतेवर शंका उपस्थित करीत अंतिमत: ‘धर्मा’चा विजय होईल, असे म्हटले आहे.

स्टॅलिन यांना अटक

विश्वासदर्शक ठरावाच्या निषेधार्थ उपोषणास बसलेले द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांना चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. स्टॅलिन हे मरीना बीच येथे उपोषणास बसले होते. पोलिसांनी स्टॅलिन यांच्यासह २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

ठिकठिकाणी हिंसाचार

सभागृहातील वादाचे पडसाद राज्यात उमटले. द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चेन्नई-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. तसेच तिरुवनमलाईबरोबरच इतर ठिकाणी धनपाल यांचा पुतळा जाळल्याचे प्रकार घडले.

  • जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या ओ. पन्नीरसेल्वम यांनी ५ फेब्रुवारीला पदाचा राजीनामा दिला.
  • जयललिता यांच्या राजकीय प्रवासात त्यांची सावली म्हणून वावरलेल्या शशिकला यांची अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागली आणि राजकीय नाटय़ समोर येऊ लागले.
  • आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करीत पन्नीरसेल्वम यांचे बंड. आपल्याला पक्षाच्या आमदारांचा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून बहुमत सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला.
  • पन्नीरसेल्वम यांच्या बंडानंतर अण्णा द्रमुकच्या १०० हून अधिक आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते.
  • दाव्या-प्रतिदाव्यांनंतरही राज्यपालांनी ‘थांबा व वाट पाहा’ अशी भूमिका घेतली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना दोषी ठरविल्यानंतर शशिकला यांच्या गटाने तातडीने पलानीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली.
  • पलानीस्वामी यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांना १५ दिवसांत बहुमत सिद्ध करणे आवश्यक होते.
  • तामिळनाडूत तब्बल ३० वर्षांनंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.