तामिळनाडू सरकारने मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे निधन झाल्याने सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांनी एका पत्रकाद्वारे याची घोषणा केली आहे. या कालावधीत तामिळनाडूतील सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येतील. या दरम्यान राज्यात कोणत्याही मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील. केंद्र सरकारनेही एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. केरळमध्येही सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंड, कर्नाटक आणि बिहारमध्येही दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मुख्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे, ताामिळनाडू सरकार मोठ्या जड अंतकरणाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सेल्वी जयललिता यांचे सोमवारी (दि. ५) रात्री ११.३० वाजता निधनाची घोषणा करत आहे. सहा डिसेंबरपासून सात दिवस राजकीय दुखवटा असेल. या कालावधीत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर असतील. या कालावधीत राज्यात अधिकृतरित्या कोणत्याही मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही.

सरकारने राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना तीन दिवसांची सुटीचीही घोषणा करण्यात आली. शेजारील केंद्रशासित राज्य पुदुचेरीमध्येही जयललिता यांच्या सन्मानार्थ मंगळवारी सर्व सरकारी कार्यालये आणि शिक्षण संस्थांना एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत.
जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले होते. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.