वैयक्तिक करिष्मा, अफाट लोकप्रियता, जनतेची नस नेमके ओळखण्याचे कसब, प्रादेशिक अस्मितेच्या भावनेला हात घालण्याची हातोटी, प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याची जिद्द आदी आयुधांच्या साहाय्याने तामिळनाडूच्या राजकारणावर स्वत:ची अमीट मुद्रा उमटवणाऱ्या जयललिता यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्काच आहे. त्यांचा मृत्यू पचवणे तामिळनाडूच्या जनतेला कठीण जात आहे. जयललितांनी आपल्या जनतेची नेहमीच काळजी घेतली. त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या आणि त्या अंमलातही आणल्या. या योजनांमुळे जयललिता यांची लोकप्रियता आणखीनच वाढली.
तामिळनाडूत जयललितांना ‘अम्मा’ म्हणजेच आई म्हणतात. ही बाब त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येण्यास पुरेशी आहे, असे म्हटले जाते. जयललिता यांनी एक रूपयांत नाश्ता, स्वस्त दरात औषधे, स्वस्तात मीठ आदी कल्याणकारी योजनांमुळे त्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या. त्यांनी अम्मा ब्रँड अंतर्गत १८ योजना सुरू केल्या होत्या.
अम्मा उपहारगृह: राज्यातील सर्व शहरांमध्ये न्याहरी आणि भोजन स्वस्त दरात मिळण्यासाठी अम्मा उपहारगृहे उघडण्यात आली आहेत.
अम्मा मिनरल वॉटर: सर्व प्रमुख शहरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बाटलीबंद पाणी केवळ १० रूपयांना उपलब्ध
अम्मा फार्मसी: सर्व प्रमुख रूग्णालयांमध्ये अम्मा फार्मसी सुरू करण्यात आली असून तेथे स्वस्त दराने औषधे मिळतात.
अम्मा बेबीकिट: नवजात अर्भकांसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू मोफत दिल्या जातात.
अम्मा मीठ: २०१४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. २५ रूपये किलो या दराने विकण्यात येणारे मीठ १४ रूपये किलो दराने उपलब्ध
अम्मा सिमेंट: गरिबांना घरे बांधण्यासाठी स्वस्त दरात सिमेंट उपलब्ध
अम्मा मोबाइल: राज्यातील सर्व बचत गटांना मोफत अम्मा स्मार्ट मोबाइल
अम्मा मिक्सर: गरीब महिलांना अम्मा मिक्सर मोफत उपलब्ध
अम्मा सिनेमा: राज्यात अम्मा चित्रपटगृहांसाठी सात जागा निश्चित. तेथे वाजवी दराने चित्रपट दाखवणार. त्याचबरोबर अम्मा दूरदर्शन, अम्मा विवाह सभागृह, अम्मा कॉलसेंटर, बी-बियाणे, चष्मा, मुलींना सायकल, मुलांना शाळेचे दप्तर, पुस्तके, गणवेश मोफत देण्यात येतात.
अम्मा लॅपटॉप: जवळपास २६ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप राज्यातील ११ लाख विद्यार्थ्यांना वाटण्याची योजना सुरू.
अम्मा जिम
अम्मा कर्ज योजना
मुख्यमंत्री आरोग्य योजना