तामिळनाडूमध्ये जलिकट्टूवरुन सुरु असलेले आंदोलन शमण्याची चिन्हे नाहीत. रविवारी अलंगनाल्लुर येथे जलिकट्टूच्या कार्यक्रमासाठी निघालेले मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांना विरोधाचा सामना करावा लागला. या आंदोलनामुळे पन्नीरसेल्वम यांना जलिकट्टू कार्यक्रमाचे उद्घाटन न करताच माघारी फिरावे लागले.

जलिकट्टूसाठी तामिळनाडूत सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी यासंबंधीच्या अध्यादेशाला मंजुरी दिली होती. यानंतर मदुराईतील अलंगनाल्लुर तसेच राज्यातील इतर भागांत रविवारी या खेळाचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी जाहीर केले होते. मात्र रविवारीही राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन सुरुच होते.

रविवारी सकाळी अलंगनाल्लुर येथे निघालेले मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्या ताफ्यालाही या आंदोलनाचा फटका बसला. आंदोलकांनी मदुराईच्या दिशेने जाणारा रस्ता रोखून धरला. त्यामुळे पन्नीरसेल्वम यांना अलंगनान्नुर येथे जाता आले नाही. माघारी परतल्यावर पन्नीरसेल्वम यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा निर्णय़ घेतला. जलिकट्टूसंदर्भातील अध्यादेश सोमवारी तामिळनाडू विधानसभेत मांडला जाईल आणि मग याला कायस्वरुपी परवानगी मिळावी यासाठी विधेयकही मांडू असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अलंगनाल्लुरमध्ये जमलेल्या आंदोलकांनी पेटा या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली असून आम्हाला कायमस्वरुपी तोडगा हवा असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. रामेश्वरममध्येही श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांनी जलिकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन केले. पुडूपट्टी या गावात जलिकट्टूचे आयोजन करण्यात आले होते. १०० हून अधिक बैल जलिकट्टूत सहभागी झाले. या खेळात ५०० ग्रामस्थांनी भाग घेतला होता.राज्यभरात जलिकट्टूचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.