कॅन्सर अर्थात कर्करोगासारख्या असाध्य आजारावर गरीब रूग्णांनाही उपचार मिळायला हवेत, ही गरज लक्षात घेऊन टाटा ट्रस्टतर्फे भारताच्या पाच राज्यांमध्ये कॅन्सर रूग्णालये उभारली जाणार आहेत. रतन टाटा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या ट्रस्टने हा समाजहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कॅन्सर रूग्णांसाठी अद्ययावत रूग्णालये उभारण्यासाठी टाटा ट्रस्टतर्फे केंद्र सरकारला १ हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत. तसेच इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईतील ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’प्रमाणेच आसाम, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कॅन्सर रूग्णालयांची उभारणी केली जाईल.

गरीब कर्करोग रूग्णांना चांगले उपचार मिळावेत हा यामागचा मुख्य हेतू आहे. मुंबईत टाटा मेमोरियल रूग्णालय आहे. या रूग्णालयात देशभरातून आलेल्या गरीब रूग्णांवर स्वस्त दरात उपचार केले जातात. तसेच त्यांना वैद्यकीय सल्लाही दिला जातो. मात्र देशभरातील सगळ्या रूग्णांना मुंबईत येऊन उपचार घेणे शक्य नसते. हीच बाब लक्षात घेऊन भारतातील पाच राज्यांमध्ये कॅन्सर रूग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय टाटा ट्रस्टने घेतला आहे.

पाच राज्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्यासाठी रतन टाटा यांनी एक हजार कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीद्वारे वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साधने खरेदी करण्यात येतील. डॉक्टर आणि नर्स स्टाफ यांना टाटा मेमोरियल रूग्णालयातून प्रशिक्षण देण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘मुंबई मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आसामच्या गुवाहाटीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात किमो थेरेपी आणि इतर सुविधा असतील. पहिल्या तीन टप्प्यात या प्रकल्पासाठी एकूण ५४० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. जयपूरमध्येही कॅन्सर हॉस्पिटलसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे अशीही माहिती समोर आली आहे.