सणासुदीला बाहेरगावी जाण्याचे ऐनवेळी बेत आखणाऱ्यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार आहे. ऐनवेळी रेल्वेचे तिकीट आरक्षणाची सोय देणारी ‘तात्काळ’ सुविधा आता ‘डायनॅमिक फेअर’ प्रणालीशी जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ‘तात्काळ’ कोटय़ातील निम्म्या तिकिटांची विक्री ‘प्रीमियम’ अर्थात चढय़ा दराने होणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना या अप्रत्यक्ष दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे.
सणासुदीच्या दिवसांत रेल्वे-एसटीचे आरक्षण फुल असते. ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी रेल्वेने ‘तात्काळ’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनेक जण या सुविधेचा लाभ घेतात. या सुविधेचा गैरवापर करत तिकिटांचा काळाबाजार झाल्याचेही मध्यंतरी उघडकीस आले होते. या पाश्र्वभूमीवर रेल्वेने देशभरातील ८० गाडय़ांसाठी ‘प्रीमियम तात्काळ तिकीट योजना’ सुरू केली. ही योजना केवळ ऑनलाइनच आहे. मात्र, या योजनेंतर्गत तात्काळ कोटय़ातील निम्म्या तिकिटांची विक्री झाली, की उर्वरित तिकिटांच्या विक्रीवर चढत्या भाजणीने भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो ३ ऑक्टोबरपासूनच लागू होईल.
मुंबईतील १४ गाडय़ांत ‘तात्काळ’ महाग
मध्य रेल्वेच्या कुशीनगर एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, राजेंद्रनगर एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेस या गाडय़ा आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस , ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस, स्वर्णजयंती राजधानी एक्स्प्रेस , पश्चिम एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस, सूर्यनगरी एक्स्प्रेस, दादर-बिकानेर एक्स्प्रेस, इंदूर-ग्वाल्हेर एक्स्प्रेस, इंदूर-भिंड एक्स्प्रेस या नऊ गाडय़ा यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
असे आकारणार तिकीटदर
*तात्काळ कोटय़ातील ५० टक्के तिकिटे चढय़ा दराने विकली जातील.
*म्हणजेच एका तिकिटाची किंमत १०० रुपये असेल आणि उपलब्ध तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटे विकली गेली, तर पुढील दहा टक्के तिकिटे १२० रुपयांत विकली जातील.
*त्यापुढील दहा टक्के तिकिटे १४४ रुपयांत उपलब्ध असतील. म्हणजेच प्रत्येक १० टक्के तिकिटांवर २० टक्के शुल्क वाढणार आहे.