१ एप्रिलपासून एक टक्का टीसीएस लागू

दागिन्यांच्या दोन लाखांवरील रोखीतील खरेदीवर १ एप्रिलपासून एक टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स) मोजावा लागणार आहे. वित्त विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर हा कर वसूल करण्याचा मार्ग मोकळा होणार असून, रोखीतील मोठय़ा व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सध्या दागिन्यांच्या पाच लाखांवरील खरेदीवर टीसीएस लागू होतो. ही मर्यादा दोन लाखांवर आणण्यात येणार आहे. वित्त विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर दागिन्यांनाही सामान्य वस्तूंच्या रांगेत बसवून दागिन्यांच्या दोन लाखांवरील रोखीतील खरेदीवर ग्राहकाकडून एक टक्का टीसीएस वसूल करण्यात येईल.

‘प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार वस्तू व सेवांसाठीच्या दोन लाखांवरील रोखीतील व्यवहारावर एक टक्का टीसीएस आकारला जातो. वस्तूंच्या संज्ञेत दागिन्यांचाही समावेश असून, यापुढे हा कर आकारला जाईल,’ असे प्राप्तीकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्राप्तीकर विभाग १ जुलै २०१२ पासून सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे. आता हा कर लागू करण्यासाठी दागिन्यांच्या रोखीतील खरेदीची ही मर्यादा दोन लाखांवर आणण्यात आली आहे. तशी तरतूद वित्त विधेयक २०१७ मध्ये करण्यात आली आहे.